Thursday, April 15, 2010

कोण आहे तुझा मी?

मनाशी पुन्हा प्रश्न आला जुना- 'कोण आहे तुझा मी'
मला तू तरी एकदा सांग ना, कोण आहे तुझा मी?

तुला मी कितीदा तरी बोललो कोण आहेस माझी
मलाही कळू दे तुझ्या भावना, कोण आहे तुझा मी!

तुला लाज माझ्यामुळे वाटते की तुला गर्व आहे?
तुझे व्यंग किंवा तुझा दागिना... कोण आहे तुझा मी?

जगाने किती तर्क केले, किती मांडले ठोकताळे..
कुणालाच आली कुठे कल्पना- कोण आहे तुझा मी!

तुझी एवढी काय माझ्यावरी मालकी चालते रे?
मला एकदा सांग माझ्या मना, कोण आहे तुझा मी..

खुशालीप्रमाणे तरी एकदा तू लिही पत्र साधे...
बघू देत पत्रातला मायना.. कोण आहे तुझा मी

"तुझ्या वर्तमानास व्यापून आहे, तुझा श्वास आहे"
फुकाचेच दावे..खुळ्या वल्गना.. कोण आहे तुझा मी?

तुझ्या जाणिवांच्या परीघात माझे जिणे का फिरावे?
मला का कळाव्या तुझ्या वेदना?कोण आहे तुझा मी?

कुणी वेगळा 'मी' जणू राहतो या शरीरात माझ्या..
स्वतःचा स्वतःशी सुरू सामना- कोण आहे तुझा मी?

जरासेच नि:संग होताच पायात घोटाळशी तू
किती रे लळा लावशी जीवना! कोण आहे तुझा मी..?