Thursday, May 19, 2011

केस आईचे जरा

केस आईचे जरा पांढरे झाले,
कोण मझ्यातुनी घाबरे झाले....

केस आईचे जरा पांढरे झाले...

मी मला शोधीत जेंव्हा आत गेलो,
मोर त्या रानातले नाचरे झाले...

मी नशीबाने दिलेला पावसाळा,
या उन्हाचेही तिला आसरे झाले...

मंद झाली चेहर्‍याची रोषणाई,
शेवटी काही दिले बावरे झाले...

कोण माझ्यातुनी घाबरे झाले,
केस आईचे जरा पांढरे झाले...

मी तुला विसरायचे

मी तुला विसरायचे राहून गेले,
मी मला बदलायचे राहून गेले..

मी तुला विसरायचे राहून गेले...

मी तुझ्या पदरात होतो झोपलेला,
सुख ते पचवायचे राहून गेले....

मी मला बदलायचे राहून गेले...

मुका पाऊस

मुका पाऊस बरसावा असे वाटते,
तुझा आवाज ऐकावा असे वाटते...

कधी धरशील का माझ्यापुढे तू चेहरा,
मला ही चंद्र स्पर्शवा असे वाटते...

तुझा आवाज ऐकावा असे वाटते.....

जरी प्रकाशाने आहे दीपवीले तुला,
तुझा काळोख सजवावा असे वाटते...

मुका पाऊस बरसावा असे वाटते,
तुजा आवाज ऐकावा असे वाटते....

जरा गर्दीत मी आता उभा राहतो,
कुणी माणूस थांबावा असे वाटते..

तुझा आवाज ऐकवा असे वाटते.....

सांजवेळी

सांजवेळी ती मनाला पाहते आहे
ती सुखाने दूर कोठे नांदते आहे

भेटली अन् हासली अन् बोलली ही ती
वाटते पण ती मनाशी भांडते आहे

सांजवेळी ती मनाला पाहते आहे.....

नीट तू आता राहा हे सांगताना ती
तू मला भेटू नको हे सांगते आहे

सांजवेळी ती मनाला पाहते आहे...

एखादा तरी

आज श्वासांनो भरा हुंकार एखादा तरी
चेतवा राखेतुनी अंगार एखादा तरी

कोठवर टिकणार कुंपण तत्त्व नियमांचे तुझे
स्पर्श माझा वादळी ठरणार एखादा तरी

साथ दे वा स्वप्न दे वा आठवांचा गाव दे
दे जगायाला मला आधार एखादा तरी

जीवनी झाले किती आरोह अन् अवरोहही
काळजाला स्पर्शु दे गंधार एखादा तरी

रिक्त हाताने कसा परतू तुला भेटून मी
काळजावरती हवा ना वार एखादा तरी

चालली आयुष्यभर नुसती तहाची बोलणी
संपण्याआधी करु एल्गार एखादा तरी

आस ही ठेऊन हल्ली दैव गझला वाचते
शब्द माझा यायचा लाचार एखादा तरी

भिंती

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती !!
.
परजून आठवांना....
करतात वार भिंती !!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती !!

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती !!

सोसून पावसाळे...
पडती न 'गार' भिंती !!

पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती !!

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती !!

तुझ्या निबीड रानामधे

तुझ्या निबीड रानामधे
सळसळणार्‍या वार्‍यासोबत
हिवाळा , उन्हाळा , पावसाळ्याच्या
नित्य नवा ऋतू असतो
असे कसे घडते प्रिये
एकाच दिवशी पुन्हा पुन्हा...

एकाच दिवशी पुन्हा पुन्हा
तुझ्या गोर्‍या बासरीवारती
माझे फुंकर ओठ जुने
छीद्रं जुनी फुंकतात तेंव्हा
नवे नवेच सूर उमटतात
कुठून कुठून पाखरं येतात...

कुठून कुठून पाखरं येतात
वेळ काळ पहात नाहीत
पानं पानं पहात झाडावरली
हिरवी कंच होतात मग
प्रत्येक वेळी नवी बहर
कुठून येतात कोण जाणे...

तुझ्या निबीड रानामधे
एकाच दिवशी पुन्हा पुन्हा
कुठून कुठून पाखरं येतात
कुठून येतात कोण जाणे.

Monday, May 9, 2011

तू कुठेतरी असशील ?
आहेस ना ?
आता हा लांबलचक रस्ता
अपरिहार्य म्हणून नकोय मला एकाकी...
आता मला गजबज हवी त्यावर
तुझ्या असण्याची...
तुझ्या नसण्याचीदेखील...

तू येऊन परत जा हवं तर
पण तू आहेस कुठेतरी
याची खात्री पटू दे एकदा

तू आहेस की नाहीस
हेही ठाऊक नसताना
तू असाल्यागत जगतोय मी
मला आठवतय तुझ्यामाझ्यातलं सारं जे कधी घडलच नव्हतं...

मी खूप एकटा आहे...
असशील तिथून निघून ये ...

खरच
तू कुठेतरी असशील...आहेस ना ?

Sunday, May 8, 2011

भेट ही घेऊ नको

भेट ही घेऊ नको ,आमंत्रणे देऊ नको
मी कघी येणार नाही वाट तू पाहू नको

एकटा माणूस आला .एकटा जाणारही
माहिती आहे तुला तू सोबती होऊ नको

शांत मी माझ्या घरी झोपेन त्यावेळी तरी
सांगते ऐकून घे ,स्वप्नातही येऊ नको

आपला मोठेपणा सांगावया लोकांपुढे
तेचते बाजार बसवे शब्द तू चिवडू नको

" धूत वस्त्रा सारखे कोणीच नाही या जगी "
या विचारांनी पुन्हा बाजी कुठे मारू नको

एकटी चालेल "शोभा " सोबती वाचूनही
तू तुझा संदेश किंवा सारथी धाडू नको

जराजरासा !!!!

तुझे नि माझे नकोच नाते, हवा दुरावा जराजरासा !
सलज्ज तारे नभी पहाया रवी झुरावा जराजरासा !!

लुभावयाला कितीक फ़ुलती गुलाब, जाई नि मोगरेही,
तुझ्या स्मृतींचा सुगंध ताजा, इथे उरावा जराजरासा !!

झपाटलेला पिसाट वारा कडी-कपा-यात बंद केला,
तुझ्या नि माझ्या उसासण्याचा उरो पुरावा जराजरासा !!

कधी नकोसे कधी हवेसे, छ्ळून जाती रदीफ़ मिसरे,
नजाकतीचाच शेर ओठी अता स्फ़ुरावा जराजरासा !!

कितीक आले लुटून गेले इथे लुटारु लुबाडणारे,
तुझा भरवसा, मुरे मुरंबा तसा मुरावा जराजरासा !!

घडी भराची नकोच संगत करार व्हावा युगांतरीचा,
तुझ्याच श्वासात श्वास माझा, अता विरावा जराजरासा !

Saturday, May 7, 2011

तुझं घर ... तुझं अंगण...
तुझं हसणं...तुझं दिसणं...
तुझं मुल...तुझं करियर ...
तुझा स्वभाव... तुझा पती...
या साऱ्या जबाबदाऱ्या
तू अगदी सहज 'मॅनेज' करत असशील....
आणि तुझ्या जीवनातलं माझं अस्तित्व
ही 'तुझी' जबाबदारी होऊच शकत नाही...

पण फक्त एक सांग....
समज मी तुझ्या हातावरलं
किंवा पायावरलं ...
सहाव्वं बोट असतो
तर तू मला टाळू शकली असतीस ?

Sunday, May 1, 2011

रिमझिमणारी

स्वप्नामधली माझी आहे रिमझिमणारी
वा-यावरती झुलता झुलता दरवळणारी

पा-यासम ती चंचल आहे मी अनुभवले
मुक्त नदी ती बारा महिने खळखळणारी

पांघरले मी श्वास तिचे अन त्याच क्षणाला
भरली माझी खोल जखमही भळभळणारी

शांत पहाटे गोड सुरावट ऐकू येई
कोकिळकंठी तीच असावी गुणगुणणारी

असण्याचा संकेत मिळे पण दृष्य नसे ती
मंद हवा ती पानांमधुनी सळसळणारी

माफक आहे आशा देवा आज हवी मज
माझ्यामधल्या प्रतिभेवरती मरमिटणारी

ओळख नसता आज गवसली "प्रविण"ला
गजलेसाठी हसरी बुजरी थरथरणारी