Thursday, April 30, 2009

वरात

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.


अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.


शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.


कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.


पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.

तू दिलेली सोडचिट्ठी...

राख नाही, ना कुठेही धूर थोडासा
काळजाचा पेटला कापूर थोडासा..



भूतकाळाची उजळणी चालली आहे,
दाटला आहे सुखाने ऊर थोडासा!



वाहतो आहेस तू रक्तातूनी माझ्या,
का तरीही वाटशी तू दूर थोडासा?



तू दिलेली सोडचिठ्ठी हरवली आता-
राहिला लक्षात पण मजकूर थोडासा..



थेट लोटांगण अताशा घेत नाही मी,
खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा..



सांत्वनाची फार घाई चांगली नाही,
ओसरूदे भावनेचा पूर थोडासा...

फुलांचा रस्ता....

पायाशी आला होता धावून फुलांचा रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा रस्ता

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा रस्ता

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली गोंदून फुलांचा रस्ता

ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा रस्ता

(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा रस्ता)

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा रस्ता

तू गेल्यावर

मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते!
तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते!

मी अंगावरच्या जखमा कुरवाळित बसलो होतो
तेव्हाच जख़्म हृदयाचे अपरोक्ष चिघळले होते!

तू गेल्यावरती दिधला मी दोष तुझ्या असण्याला
पण्........अस्तित्व तुझे माझ्यात तेव्हा विरघळले होते!

...चुकले असावे

वागणे चुकले असावे
बोलणे चुकले असावे



पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे



आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे

"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे



ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे



गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!



तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे

पाहतो श्वासात कोठे . .लागतो काही सुगावा

पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

ती म्हणाली "माग ना रे. . . तू, मला सोडून काही"
(आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !)

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास् आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?

लागलॊ जेव्हा जळाया यातना झाल्या न काही
पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा

Wednesday, April 8, 2009

"....तयार झालो"

जसा जसा मी जगावयाला तयार झालो,
तसा तसा मी लढावयाला तयार झालो..

सडा असा शिंपलास तू अंगणात माझ्या,
पसा पसा मी भरावयाला तयार झालो..

बघून मागे कशीबशी हासलीस जेव्हा,
कसाबसा मी हसावयाला तयार झालो..

न खंत आभाळ फाटण्याची मला तशी पण,
ससा कसा मी बनावयाला तयार झालो?

विषा, तुला ओळखून होतो तरी कसा रे,
नसा नसा मी भरावयाला तयार झालो?

अखेर तू ही मनातले बोललीस जेव्हा,
ढसा ढसा मी रडावयाला तयार झालो !

तुझी न ही पायधूळ जेव्हा मला कळाले,
ठसा ठसा मी पुसावयाला तयार झालो..

तिने नव्याने दिला जरी तो जुना बहाणा,
असा कसा मी फसावयाला तयार झालो

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच माझे

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! - चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! - चुकलेच माझे!

गझल माझी तसतशी

पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते

फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते

पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते

केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते

काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते

काय या मद्यात जादू कोण जाणे?
घोट जातो आत छाती रुंद होते

का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते

जसजसा जमिनीमधे मी एक होतो
गझल माझी तसतशी उत्तुंग होते

पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते?

सखे

नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता

तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता

जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता

इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता

असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता