Sunday, June 26, 2011

गोष्टी

आधीच मी मनाशी, केल्या तयार गोष्टी
तू भेटशील तेव्हा, बोलू हजार गोष्टी...

बोलू जरा मनाचे, बोलू कुणा-कुणाचे..
संपून शब्द जाता, आणू उधार गोष्टी !

राहू उभे जरासे, पायावरी स्वताच्या
आकाश तोलण्याच्या झाल्यात फार गोष्टी..

समजू नका मला रे, इतका निरूपयोगी
सांगू शकेन मी ही, युक्तीत चार गोष्टी

गोष्टीत शेवटाला, सारेच गोड होते
भलत्याच भाबड्या या असतात यार, गोष्टी !

ऐकून गोष्ट माझी, भिजले कितीक डोळे..
कित्येक पापण्यांना, होतात भार गोष्टी

कविता, विकार, चष्मा, काठी, दिवा, बिछाना...
उरतात सोबतीला, असल्या चुकार गोष्टी...!!

Tuesday, June 14, 2011

तुझ्या - माझ्यात झालेले..

किती होते निराळे ते तुझ्या - माझ्यात झालेले
कुणा नाही कळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

ढगामध्ये, मनामध्ये, कुणाच्या पापण्यामध्ये..
कुठे नाही गळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले

असू दे ओल थोडीशी मनाला भूतकाळाची,
नको मोजू उन्हाळे ते, तुझ्या - माझ्यात झालेले..

नव्हाळी ती, जिव्हाळे ते, दिलासे ते, खुलासे ते,
उसासे ते, उमाळे ते... तुझ्या माझ्यात झालेले !

तुला ना आठवे काही, मलाही काळजी नाही
कुणाचेही न झाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले...

कळेना खून होता की, असावी आत्महत्या ती?
पुलाखाली मिळाले ते, तुझ्या - माझ्यात झालेले..!

लुप्त

झरे आसवांचे कसे लुप्त झाले?
थवे आठवांचे कसे लुप्त झाले?

जशी लुप्त होते समुद्रात नौका,
तुझे नाव आता तसे लुप्त झाले..

अशा लोपल्या आज आणा व भाका,
जसे घेतलेले वसे लुप्त झाले..

नको शोध घेऊ पुराण्या खुणांचा
तुझ्या पावलांचे ठसे लुप्त झाले..

उरातून गेली अशी 'हाय' माझ्या,
तिचे सांजवेळी हसे लुप्त झाले..!

कसा मेळ व्हावा

मला एक छोटा दिवा पाहिजे
तुला चांदण्यांचा थवा पाहिजे

मला ओढ आहे उन्हाची तशी-
तुला पावसाळी हवा पाहिजे

मला मुग्धतेचा लळा लागला..
तुला साजणी मारवा पाहिजे

मला तू हवी रोजच्यासारखी,
तुला रोजचा 'मी' नवा पाहिजे !

कसा मेळ व्हावा सये आपला??
मने जोडणारा 'दुवा' पाहिजे...

वेळ जावा लागतो...

माणसे समजावयाला वेळ जावा लागतो
माणसे बदलावयाला वेळ जावा लागतो...

देवळे उधळावयाला फारसा नाही तरी,
देवळे बनवावयाला वेळ जावा लागतो

आपल्याही माणसांना ठोकरावे लागते,
अर्जुना उमगावयाला वेळ जावा लागतो

मागतो मी सांडत्या तार्‍यास काही आजही,
भाबडेपण जावयाला वेळ जावा लागतो...

"का मनाचे घाव ओले?" प्रश्न का पडला तुला?
साजणी, विसरावयाला वेळ जावा लागतो !

हासण्याचे अर्थ माझ्या, वेगळे काढू नका
आसवे उतरावयाला वेळ जावा लागतो...

रे प्रवाशा! तप्त देशी चालणे ना थांबवी,
चांदणे बरसावयाला वेळ जावा लागतो...

हो, कविता जन्म घेते रोज माझ्या अंतरी
'काफिये' जमवावयाला वेळ जावा लागतो....

ठिपका

घडायचे ते घडले काही टळले नाही
त्या वळणावर तुला भेटणे चुकले नाही

कळले नाही कसा कधी संवाद संपला
वाद कधी मग सुरू जाहला कळले नाही

आज अचानक अर्थ असा हा समोर आला
त्या धक्यातुन शब्द कधी सावरले नाही

तू ओठांनी निर्धाराने खूप लपवले
पण डोळ्यांना तुझ्या कधी ते जमले नाही

तशी जुनी शब्दांची माझी ओळख आहे
पण अश्रूंना का त्या मी ओळखले नाही

मान्य कधीही केले नाही आपण चुकलो
दोघांमधले अंतर मग हे घटले नाही

बदलत गेला रस्ता अन मी बघत राहिलो
रस्त्यासंगे मला बदलणे जमले नाही

तू जाताना नजर तुझी माघारी वळली
का माघारी पाय तुझे पण वळले नाही?

बघत राहीलो दूर तुला ठिपका होताना
मला कळेना का डोळे हे मिटले नाही

कळता कळता...

चंद्र लाजला नभात कैसा पळता पळता
कळेल तुजला भेद सखे हा कळता कळता...


नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बांधे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता


'अंत' नव्हे हा, 'मोक्ष' साजणा तुझा असे रे,
शमा म्हणाली परवान्याला जळता जळता...


पुन्हा भेटुया क्षितिजावरती दोघे आपण,
सूर्य बोलला असेच काही ढळता ढळता...


तिचा जरासा स्पर्श लाभला सांत्वनवेळी
अश्रूंची मग फुलेच झाली, गळता गळता....

Monday, June 6, 2011

ना उन्हाळा भोगला मी फारसा

ना उन्हाळा भोगला मी फारसा...
तू नको इतक्यात येऊ पावसा...

दु:ख आहे नेहमीचा सोबती
सांग का ठेवू सुखावर भरवसा?

हरवले गर्दीत सारे चेहरे
पारखा माणूस येथे माणसा...

सोडुनी गेला पुढे तो एकटा
(पावलाचा पुसटसा आहे ठसा)

दाटला अंधार सारा भोवती
चांदण्याचा एक आहे कवडसा...

लोकहो, इतके करा आता तरी
दु:ख देताना मला, थोडे हसा!

Wednesday, June 1, 2011

पसारा...

प्रेमाचा हा खेळच न्यारा
रक्ताचाही उडतो पारा

म्रुत्यू काही मागत नाही
जगण्यासाठी किती पसारा

एक ओळही समजत नाही
जीवन म्हणजे गूढ उतारा

गुदमरतो हा गंध फुलांचा
देना थोडा उधार वारा

इच्छा कोठे पुर्ण जाहल्या
अनेकवेळा तुटला तारा

''चेहरा''

चेहर्‍याची चांगली ही रीत नाही
अंतरीचे दु:ख तो लपवीत नाही

साहिल्या इतक्या झळा या जीवनाच्या
हाय ! आता आगही जाळीत नाही

वाटण्या आलो जगाला मोद किंतू
सौख्य इतुके माझिया झोळीत नाही

चालतो मी आजही नाकासमोरी
पण इथे रस्ते सरळ ओळीत नाही

सौख्य अज्ञाना मधे ही गोष्ट सच्ची
का तुला ”प्रविण” हे माहीत नाही?

तुझे हेच डोळे

तुझे हेच डोळे, मला पाहताना, किती मोरपंखी, निळेशार होते,
कळ्या-पाकळ्यांचे, तुझ्या पापण्यांचे, किती जीवघेणे, तरी वार होते !

नभाच्या उराशी, निळ्या ओट्-पोटी , भिनू जात होता, जसा सांजवारा,
तसे विरघळोनि, तुझ्या ह्या भिवांशी, मला भेटले, चांदणे चार होते !

निळे-जांभळे, आरसे अम्बराचे, तुझे रूप आता, मला भेट देती,
हळू चुम्बताना, तुला मौन माझे, किती पांढरे, शुभ्र आकार होते !

नव्या पैजणान्शी, तुझ्या खेळताना, मला नाद छन-छन किती घुंगरांचा,
जिथे ओठ माझे, तुझे भेटले ते, तुझे राजवर्खी अलंकार होते !

किती बोललो मी, तुझ्याशी तरीही, अता शब्द देती न वाचा नव्याने,
तुझे बोलके मौन, सार्या क्षणांचे, दिसांचे, खरे शेंदरी सार होते !