Thursday, April 28, 2011

चार ओळी

खरडल्या चार ओळी,
रखडल्या फार ओळी..

जिवाला त्रास झाला,
अता सुचणार ओळी

कसे एकाग्र होऊ?
मनावर स्वार ओळी

किती त्वेषात म्हटल्या
तिने लाचार ओळी

व्यथेची वाफ झाली..
बरसल्या गार ओळी

लिहूया चल; जिथे ना-
कुणी पुसणार ओळी..!

रात्र आली

रात्र आली चांदण्याना माळुनी
अन पुन्हा गेली जिवाला जाळुनी

देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रेंगाळुनी

यामुळे ना मांडला प्रस्ताव मी
वाटले देशील तू फेटाळुनी

वर्षु दे पाऊस स्पर्शाचा तुझ्या
रात्र सारी जाउ दे गंधाळुनी

सौख्य ना आले कधी भेटावया
घेतले दुःखास मी कवटाळुनी

तू दग्याने प्राण माझा घेतला
मी दिला असता तुला ओवाळुनी

आसवे

आज नयनी पुन्हा जागली आसवे
भंगली शांतता वाजली आसवे

लोक जातात नयनांवरी कोरड्या
हाय दिसती कुठे आतली आसवे

तू जरी धाडले शुद्ध हासू मला
पोचता पोचता जाहली आसवे

आठवांच्या तुझ्या या वरातीमधे
वेदना प्राशुनी नाचली आसवे

जाहलो मी अता आसवांची कबरमी
मला खोडुनी गाडली आसवे

ही गझलही नसे ही नसे गीतही
फक्त मी तुजपुढे ढाळली आसवे

प्राणात तुला जपले

प्राणात तुला जपले मी डोळ्यात न येऊ देता
गुणगुणतो गीत तुझे मी ओठात न येऊ देता

रडलो तर रडलो ऐसा कळलेच कुणाला नाही
हसलो तर हसलो हासू गालात न येऊ देता

(यासाठी मंदिर मस्जिद गरजेचे वाटे त्यांना
देवाला पुजता येते हृदयात न येऊ देता)

पाजावे जहर कुणाला हातून तुझ्या पाजावे
शंकेचा गंध जराही जहरात न येऊ देता

भरणार कधी ना ऐशा का झाल्या असत्या जखमा
जर डाव उधळला असता रंगात न येऊ देता

ज्या रातीसाठी केल्या बरबाद हजारो राती
काळाने नेले मजला ती रात न येऊ देता

भेट चोरटी...

आज तू खुशाल गाल लाल होत जाउदे,
भेट चोरटी जरा 'जहाल' होत जाउदे...

रोज मंद गंध होत अंतरंग व्यापतो,
आज अंग माखण्या गुलाल होत जाउदे

ठेवणीतला नकोस दागिना करू मला,
वापरातला तुझा रुमाल होत जाउदे !!

देह लोळतो किती सुखात साजणे तुझा,
हे न फार चांगले, तु 'हाल' होत जाउदे...

स्वप्न्-बिप्न सोड, आज थेट भेट नेटकी..
सारखी पुढेच वाटचाल होत जाउदे..

रोज रोज काय तेच गोड गोड बोलणे?
तू कधी कधी अशी धमाल होत जाउ दे..!

तोलतात शब्द शब्द खोल, बोलतात की-
"गालगाल गालगा"त चाल होत जाउदे..!!

Wednesday, April 27, 2011

हवा

कोणत्या गावातुनी आली हवा
का अशी वेडीपिशी झाली हवा

गाल हे पडद्यामधे झाकून घे
उडवुनी नेईन ही लाली हवा

आग होती एवढीशी लागली
पण अचानक वाढली साली हवा

लाभले तुजला जसे तारुण्य हे
भोवती पिंगा तुझ्या घाली हवा

निर्मितो पाऊस गाणे लाघवी
लाविते अन रेशमी चाली हवा

एवढा विश्वास तू टाकू नको
का कुणाची राहते वाली हवा......

भळभळतांना जाणवले की..

भळभळतांना जाणवले की रुतले होते टोक किती
जगण्याच्या माथ्यावर पडली 'तू नसल्याची ' खोक किती..!

सुखा, तुझ्यापाठी पळतांना जाणवले नाहीच कधी,
अस्तित्वाच्या ताठ कण्याला सुटले माझ्या पोक किती !

परस्परांशी सौहार्दाचे प्रयोग रंगत गेले अन्
पडद्यामागे जाता जाता बदलत गेले लोक किती..

यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजून टाका की--
किती अडाणी लोक शहाणे? शिकलेले बिनडोक किती?

किती उपेक्षा केली त्याची, सदैव जे माझे होते..
कधीच माझे झाले नाही, त्याच्यासाठी शोक किती !

शिकून घ्या रे सगळे ओझे अपुले आपण पेलाया
खुशाल टाका मान, असे उरले खांदे निर्धोक किती??

तुलाही, मलाही..

जुळा ध्यास आहे तुलाही, मलाही
तरी त्रास आहे तुलाही, मलाही..

कसे ओळखावे तुला मी, मला तू..
व्यथा खास आहे, तुलाही, मलाही

अताशा मिठीही अशी वाटते की,
गळा फास आहे तुलाही, मलाही..

जुन्या लालसेचा विझेना निखारा,
नवी आस आहे तुलाही, मलाही..

तशी एक आहे व्यथा सारखीशी,
म्हणायास आहे, तुला- ही, मला- ही

कशाला कुणी दोष द्यावा कुणाला
'इतीहास' आहे, तुलाही..मलाही...!!

भेटून जा

आसमानीच्या परी , भेटून जा
एकदा केव्हातरी भेटून जा...

मी समुद्रासारखा नाही जरी,
तू सरितेच्या परी भेटून जा

सावल्यांचे खूप झाले भास गे,
मन्मनाच्या अंतरी भेटून जा

मी तुला आव्हान आहे बांधले,
वादळा, माझ्या घरी भेटून जा..

दु:ख माझे माणकाच्या सारखे,
वेदनाही भर्जरी , भेटून जा

श्वास आता धाप टाकू लागले,
साजणे, आता तरी भेटून जा...

Monday, April 25, 2011

हुंदका माझा तसा बंदिस्त आहे,
आसवांना लावलेली शिस्त आहे

यौवना जाऊ नको बाहेर कोठे
भोवताली वासनेची गस्त आहे.

हास्य आहे चेहऱ्यावरती फुलाचे,
बाग हृदयाची परी ती ध्वस्त आहे

राहिला नाही भरवसा पावसाचा
आसवांवरती पिकांची गस्त आहे

बंद पडल्या काळाच्या त्या पाणपोया
माणसाचे रक्त आता स्वस्त आहे.

Saturday, April 23, 2011

शोध ज्याचा घेतला तो..('जुस्तजू...'अनुवाद)

जुस्तजू जिसकी थी उस को तो न पाया हमने
इस बहाने से मगर देख ली दुनिया हमने
शोध ज्याचा घेतला मी, भेटला नाहीच तो तर
या निमित्ताने, चला, ही बघितली दुनिया कलंदर

तुझको रुसवा न किया खुद भी पशेमाँ न हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने
भेटलो नाही तुला मी, दूर आपणहून गेलो
रीत प्रीतीची तशी मी पाळली होती बरोबर

कब मिली थी, कहाँ बिछड़ी थी, हमें याद नहीं,.
ज़िन्दगी तुझको तो बस ख़्वाब में देखा हमने,
सोबतीने राहिलो नाही कधी दोघे पुरेसे....
पाहिले केवळ तुला स्वप्नात आयुष्या खरोखर

ऐ 'आद' और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने ...
काय आता ऐकवावे? काय सांगावे कुणाला?
एकट्याने वाट माझी चाललो आहे निरंतर..

जुने, विसरून गेलेले...

कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पुन्हा का आठवावे ते, जुने विसरून गेलेले...

पुन्हा सारे तपासावे मला लागेल एकांती,
कधी जे वाटले होते मला समजून गेलेले

कसे चुकले जरा माझे, मला शिकवू नका कोणी,
पहा , चुकलेत ते सारे - मला शिकवून गेलेले

पुन्हा ती भेटली तेव्हा, जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता, तिचे बदलून गेलेले..

दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !

कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...

कुणाचे श्वासही छातीत माझ्या मोजता यावे,
कुणी नाही , कुणी नाही , असे जवळून गेलेले

असावी वाट एखादी, दिशा छेदून जाणारी
दिसावे गाव एखादे, व्यथा हरवून गेलेले !

मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...

जरासे थांबले नाही, कुणी माझ्या चितेपाशी
जरा हेलावले नाही, मला उचलून गेलेले....

Tuesday, April 19, 2011

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला , सांगू कसे रे याहुनी

घरदार येते खावया,नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका,वेड्यापिश्या स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते,माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे,दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका,दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती,आज्ञा तुझी ती मानुनी

वाहिवाटलेली वाट ती,मी कटते दररोज रे
अन प्राक्तनावर रेलते,छाती तुझी ती मानुनी

Sunday, April 17, 2011

बदनाम

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

का एवढ्याचसाठी ही साथ सोडली तू?
की ऐनवेळ ओठी माझ्या नकार आला...

हे ही बरेच झाले की बोललास खोटे
आहे कुठे खर्‍याची परवा इथे कुणाला?...

कळले असेल आता रडले पुन्हा पुन्हा का?
जखमा नवीन होत्या नाजूक काळजाला...

ढळता उन्हे तशी ती जाते विरून छाया
हा शाप सावलीला देवा दिला कशाला?...

मीरा तुझ्याचपायी प्याली जरी विषाला
बदनाम शाम तू रे नाही कधीच झाला...

जखमा जुन्या

का मोगरा उशाला, तू माळतेस आता
काळीज आठवांनी, का जाळतेस आता

मोडून स्वप्न सारी ती रात रंगलेली
त्या काजळी सुखांना का भाळतेस आता

गेला निघून गेला तांडा नव्या दिशेला
त्याच्या खुणा कशाला सांभाळतेस आता

काळास दोष नाही वेळाच थांबलेल्या
का जाहल्या चुकांना मग चाळतेस आता

सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले
डोळ्यातले झरे का ते गाळतेस आता

आक्रोश या 'मनी'चा कोणास ना कळाला
जखमा जुन्या कशाला तू पाळतेस आता

Friday, April 15, 2011

निशिगंध तिच्या नजरेचा

निशिगंध तिच्या नजरेचा
डोळ्यात दर्वळे माझ्या
चाहूल तिच्या प्रीतीची
हृदयात दरवळे माझ्या

आभास सारखा होतो
ती आली येत असावी
झंकार पैंजणाचा त्या
कानात दर्वळे माझ्या

रेषांचे तळहातावरल्या
ताटवे फुलांचे झाले
तो हात तिच्या मेंदीचा
हातात दर्वळे माझ्या

ओठांनी ओठावरती
मग लिहिली सुंदर गाणी
तो स्पर्श तिच्या श्वासांचा
रक्तात दर्वळे माझ्या

लाजून बिलगली मजला
हलकेच म्हणाली सजना
अनमोल प्रीतीचा अपुल्या
स्वप्नात दर्वळे माझ्या.