भळभळतांना जाणवले की रुतले होते टोक किती
जगण्याच्या माथ्यावर पडली 'तू नसल्याची ' खोक किती..!
सुखा, तुझ्यापाठी पळतांना जाणवले नाहीच कधी,
अस्तित्वाच्या ताठ कण्याला सुटले माझ्या पोक किती !
परस्परांशी सौहार्दाचे प्रयोग रंगत गेले अन्
पडद्यामागे जाता जाता बदलत गेले लोक किती..
यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजून टाका की--
किती अडाणी लोक शहाणे? शिकलेले बिनडोक किती?
किती उपेक्षा केली त्याची, सदैव जे माझे होते..
कधीच माझे झाले नाही, त्याच्यासाठी शोक किती !
शिकून घ्या रे सगळे ओझे अपुले आपण पेलाया
खुशाल टाका मान, असे उरले खांदे निर्धोक किती??
No comments:
Post a Comment