Monday, February 28, 2011

नाव तुझ्या ओठावर...

नाव तुझ्या ओठावर माझे
धरती माझी अंबर माझे

स्पर्शामधला प्रश्न तुझा अन
मौनामधले उत्तर माझे

रात्र तुझ्या स्मरणात काढतो
स्मरण तुझे झाले घर माझे

मला बिलगला गंध तुझा अन
तुला लागले अत्तर माझे

हा सारा माझाच उन्हाळा
हे सारे गुलमोहर माझे

मी प्रेम दे म्हणालो...

मी प्रेम दे म्हणालो, 'देते' म्हणून गेली
जे जे मनात माझ्या, ते ते म्हणून गेली...

मी हे हृदय सखीच्या जेंव्हा पुढ्यात केले
ना बोलता खुणेने 'घेते' म्हणून गेली...

सुख-दु:ख वाटताना देऊन सौख्य मजला
सार्‍या व्यथा मला मी नेते म्हणून गेली...

त्यांना नसेल कळली प्रीती तिची नि माझी
ती चक्क माणसांना 'प्रेते' म्हणून गेली...

देऊन प्राण ज्यांनी प्रितीस अमर केले
त्या सर्व प्रेमिकांना 'जेते' म्हणून गेली...

ओळख मलाच माझी होती नवीन तेंव्हा
जेंव्हा तिच्या सख्यांना हे, 'ते' म्हणून गेली..

हा काय दोष माझा? ते वय उनाड होते
स्पर्शात अंग माझे चेते म्हणून गेली..?

मी रोज वाट बघतो जाऊन त्या ठिकाणी
जेथे कधी मला ती 'येते' म्हणून गेली...

जन्मभर तुडवीन मी ...

जन्मभर तुडवीन मी रस्ता उन्हाचा
पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा

पूर आला हे बरे डोळ्यात झाले
साचला होता किती कचरा उन्हाचा

मी जशी खिडकी उघडली, आत आला
केवढ्या वेगामधे तुकडा उन्हाचा

दग्ध ओठांनी तुझ्या केसांमधे मी
माळला होता कसा गजरा उन्हाचा

यामुळे तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर
रंग नाही एवढा गोरा उन्हाचा

घालतो पायामधे चपला उन्हाच्या
हिंडतो बांधून तो पटका उन्हाचा

राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा

दिवस गेला, सांज ढळली पण अजुनही
उडत आहे मंदसा धुरळा उन्हाचा

Sunday, February 27, 2011

चाहुलीची तुझ्या चमक...

चाहुलीची तुझ्या चमक बोलायची
येत आहेस तू सडक बोलायची

भेटुनी फायदा काय आहे तिला
पहिजे ना मना धमक बोलायची

ओठ रक्ताळले लाल झाला गळा
काय इतकी गरज कडक बोलायची

बोल केव्हातरी मुक्त वार्‍यापरी
सोड आखिव सवय सुबक बोलायची

जे तुझ्या अंतरी तेच माझ्या मनी...
व्हायला लागली धडक बोलायची

खूण साधी पुरे शाहण्याला कळे
काय आहे गरज ठळक बोलायची

एक पाखरु फांदीवर...

एक पाखरु फांदीवर
फांदी हलते खाली वर

वेल लावली प्रेमाची
धोके फुलले वेलीवर

भांडण होते दिवसाशी
चिडतो आपण रात्रीवर

पृथ्वी नावाचे घरटे
आकाशाच्या फांदीवर

शाप किती बनले त्यांचे
दिलेत तू तर काही वर

त्यांचे बळ, त्यांची उर्जा
सरते भाषणबाजीवर

जगणे भिजले अश्रूंनी
टाकू कुठल्या दोरीवर

चल मिसळू मातीत पुन्हा
खूप थांबलो मातीवर