Thursday, July 28, 2011

असेच हे

असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे,
कुठेतरी कधीतरी
असायचे... नसायचे

असेच सोससोसता
हसून हासवायचे;
असेच हासहासता
हळूच विव्हळायचे

असाच राहणार मी
जिता तुरुंग आपुला,
अशाच बाळगीन मी
सुटावयास श्रृंखला

असाच हा गिळायचा
गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका

अशीच येथली दया
हवेत चाचपायची;
अशीच जीवनास ह्या
पुन्हा क्षमा करायची

असाच श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा

असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे;
हव्या हव्या क्षणासही
नको नको म्हणायचे

असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे;
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे

Tuesday, July 5, 2011

बाहुली

पाखराला हीच चिंता मामुली...!
का नसे मैत्री नभाशी आपुली ?

जाळ येथे जास्त; तर तेथे कमी...
शेवटी साऱ्याच मातीच्या चुली !

नोकरी, पैसा, प्रतिष्ठा, मान्यता...
ठेव बाजूला जराशा या झुली !

भासही आता खरे होती कुठे ?
भास हे नाहीत; त्यांच्या चाहुली !

पाहिले जेव्हा मला त्याने सुखी....
दुःख गेले दूर...आल्यापाउली !

फार मी सांभाळतो; जपतो तिला -
वेदना अद्याप माझी तान्हुली !

वाकलेली जख्ख म्हातारी कुणी...
शोधते का बालपणची बाहुली ?

फलाट

रान या मनात गच्च, दाट पाहिजे !
मात्र त्यात एक चोरवाट पाहिजे !

हेच स्वप्न रात्र रोज रोज पाहते...
व्हायला अता तरी पहाट पाहिजे !

पाहिजे स्वतःस नाव कोणते तरी...
कोणता तरी जिण्यास घाट पाहिजे !

गुंतलास काय कौतुकात एवढा ?
रोज का तुला नवीन भाट पाहिजे ?

मागतो तुला कुठे समुद्र मी तुझा ?
फक्त एक मत्त, धुंद लाट पाहिजे !

व्यक्त व्हायला जमो; जमो न, शेवटी -
कल्पना तरी तुझी विराट पाहिजे !

मी न येथला; मला निघून जायचे...
जीवना, जरा तुझा फलाट पाहिजे !

ठक....

सारे ठरून गेले हे नाटकाप्रमाणे !
मी नोकराप्रमाणे; तू मालकाप्रमाणे !

छोटा तुझ्यापुढे मी...पण यामुळेच मोठा...
दारी तुझ्या न आलो मी याचकाप्रमाणे !

नाही तुझी मिळाली पाठीस स्पर्शमाया...
फटकारलेस तूही मज चाबकाप्रमाणे !

ओथंबलीसही तू ! खोळंबलीसही तू !
केली न मी प्रतीक्षा पण चातकाप्रमाणे !

काळास कोणत्याही मी बांधला न गेलो...
मी चाललो कधी का कुठल्या शकाप्रमाणे ?

मी एवढा न साधा; मी एवढा न सोपा...
वाचू नये कुणीही मज पुस्तकाप्रमाणे !

फसलो जिथे तिथे अन् परिणाम हा असा की -
मी भेटतो मलाही आता ठकाप्रमाणे !

...स्वप्न सूर्याचे !

वेदना माझी मला रस्त्यात थाटू लागली !
आसवांनाही अखेरी लाज वाटू लागली !

थांब, थोडीशीच कळ काढायची आहे तुला..
रात्र दुःखांची तुझ्या, आता पहाटू लागली !

जी गुन्ह्यावाचूनही वाट्यास आली, ती सजा -
- पेकलेली माणसे चुपचाप काटू लागली !

गाव हे सारे गिळाया आग आली कोणती ?
देह कोळपले; मनेसुद्धा खराटू लागली !

रोज डेरेदार ढेऱ्या वाढती तुमच्या किती...
काय चिंता ? आमची पोटे खपाटू लागली !

मागणी केली असावी मीच काटेरी तुला...
...दान घेताना तुझे; झोळीच फाटू लागली !

घट्ट केले मन; तरी हे सत्य स्वीकारू कसे ?
चाललो थोडा़; उभारी तोच आटू लागली !

स्वार्थ आपुलकीतला पायात घोटाळे किती...
मतलबाची मांजरी अंगास चाटू लागली !

चालली मोठ्य़ा सुखांची मजवरी जादू कुठे...?
मात्र ही साधीसुधी दुःखे झपाटू लागली !

आठवांचा मारवा माझ्या मनी झाला सुरू...
सांज भासांची पुन्हा हृदयात दाटू लागली ?

भेटल्यानेही कसे पावित्र्य भंगू लागले...
बोलल्याने माणसे येथील बाटू लागली !

लाज झाकायास आडोसा न दारिद्र्या तुला...
त्यात ही दिवसेंदिवस छाती तटाटू लागली !!

शेवटी साऱ्या यशांची हीच ना शोकान्तिका ?
जी नको ती माणसेही श्रेय लाटू लागली !

पाहिले मी स्वप्न सूर्याचे; किती मोठा गुन्हा !!
काजव्यांची फौज माझे पंख छाटू लागली !

बासरी नादावली रे...

भावभोळी भक्ति माझी राधिकेला भावली रे
आज कान्हाच्या कृपेची बासरी नादावली रे...

देव आहे बापआई पोरक्या जीवास माझ्या,
ऐकुनी आकांत वेडा, माउली ती धावली रे...

मानसीच्या शिंपल्याचे मोहमोती साठलेले,
माळ त्यांची अर्पिण्याला त्यागसूत्रे ओवली रे...

या जगाशी झुंजताना ताप होतो अंतरी या,
सर्व कष्टातून काढी आज त्याची सावली रे...

त्यास ठावे काय माझा पुण्यसाठा संचिताचा
तोकडी माझी तपस्या, नाम घेता पावली रे...

अर्पिण्या देवास काही आगळे माझे असे ना,
ग्रास घे सर्वस्व माझे, माय प्रेमे जेवली रे...

आज माझी प्रेमवल्ली पुष्प देई भावनांचे

गंध नाही फारसा...

वर्तमानाशी जुळाला बंध नाही फारसा
अन भविष्याचा मनाला गंध नाही फारसा...

सोसण्याचा तो पुराणा भोग आहे आजही,
सोसण्याचा तो जुना आनंद नाही फारसा

कायदे तोडावयाचे वेड आता संपले..
कुंपणे ओलांडण्याचा छंद नाही फारसा

मोरपंखी या व्यथांना तू सये माळून घे...
हाय! आता मोगराही धुंद नाही फारसा

फारशा आता अपेक्षा ठेवणे तू सोड गे,
माझिया ह्रदयात आता स्पंद नाही फारसा...

रस्ता

भेटल्यावर तोंडभर जे हासले
तेच फिरता पाठ मागे बोलले

मी कधी पडलो न येथे एकटा
सोबतीला एकटेपण थांबले

तू कशाला हाक निघताना दिली
जायचे माझे अशाने लांबले

आठवांचे काय मी आता करू ?
कोपरे सारे मनाचे संपले

शब्द हे वेळी अवेळी भेटती
लोक म्हणती वेड ह्याला लागले

सांग तू कविते मला हे एकदा
चार शब्दांनी कुणाचे भागले?

मी जसा आहे तसा आहे सुखी
येव्हढे पण सुख कुणाला लाभले?

हा मला रस्ता मिळाला शेवटी
चाललो मी लोक मागे चालले

शेवटी तो माणसागत वागला
शेवटी उपकार त्याने मोजले!

माझे कसे म्हणावे

माझे कसे म्हणावे संबंध मी कुणाचे,
माझे कुणा म्हणू मी, झाले कुणी कुणाचे?

श्वासात गुंगवूनी आश्वासनेच देती
प्राणात ना भिनावे ते वास अत्तराचे....

बेभान होउनीया गातील गोड गाणी
माझ्या कथेव्यथेशी नाते नसे स्वराचे....

शब्दातली खुमारी बांधी प्रबंध येथे
माझे विचार नाही उच्चारलेत वाचे....

स्पर्शात मार्दवाचा रेशीमभास होतो
का त्यात जाणवावे व्यर्थत्व बेगडाचे....

संबंध मानताना व्यक्ती गुलाम होतो
का मी हरून जावे स्वातन्त्र्य या मनाचे....

वेडा म्हणाल किंवा माथेफिरू दिवाणा
स्वीकार होत नाही नाते मनी कुणाचे..