Tuesday, July 5, 2011

...स्वप्न सूर्याचे !

वेदना माझी मला रस्त्यात थाटू लागली !
आसवांनाही अखेरी लाज वाटू लागली !

थांब, थोडीशीच कळ काढायची आहे तुला..
रात्र दुःखांची तुझ्या, आता पहाटू लागली !

जी गुन्ह्यावाचूनही वाट्यास आली, ती सजा -
- पेकलेली माणसे चुपचाप काटू लागली !

गाव हे सारे गिळाया आग आली कोणती ?
देह कोळपले; मनेसुद्धा खराटू लागली !

रोज डेरेदार ढेऱ्या वाढती तुमच्या किती...
काय चिंता ? आमची पोटे खपाटू लागली !

मागणी केली असावी मीच काटेरी तुला...
...दान घेताना तुझे; झोळीच फाटू लागली !

घट्ट केले मन; तरी हे सत्य स्वीकारू कसे ?
चाललो थोडा़; उभारी तोच आटू लागली !

स्वार्थ आपुलकीतला पायात घोटाळे किती...
मतलबाची मांजरी अंगास चाटू लागली !

चालली मोठ्य़ा सुखांची मजवरी जादू कुठे...?
मात्र ही साधीसुधी दुःखे झपाटू लागली !

आठवांचा मारवा माझ्या मनी झाला सुरू...
सांज भासांची पुन्हा हृदयात दाटू लागली ?

भेटल्यानेही कसे पावित्र्य भंगू लागले...
बोलल्याने माणसे येथील बाटू लागली !

लाज झाकायास आडोसा न दारिद्र्या तुला...
त्यात ही दिवसेंदिवस छाती तटाटू लागली !!

शेवटी साऱ्या यशांची हीच ना शोकान्तिका ?
जी नको ती माणसेही श्रेय लाटू लागली !

पाहिले मी स्वप्न सूर्याचे; किती मोठा गुन्हा !!
काजव्यांची फौज माझे पंख छाटू लागली !

No comments:

Post a Comment