Friday, September 18, 2009

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

Sunday, May 10, 2009

वादळ...

वादळाने, कधी असते, यायचे
हे का, आम्ही असते, ठरवायचे...?

सलगी करु, म्हणतो वादळाशी
ऐकता, ते नेमके, बहकायचे...

वादळाला, जाणताना, त्रास होतो
का तरी, काळीज, त्याचे व्हायचे...?

वादळाची, ओढ होती, अंतरीला
श्वास तेथे, खेचुनी, मज न्यायचे...

उब नाही, मिठीमध्ये, वादळाच्या
का तरी, काळीज, वेडे व्हायचे...?

पुरवितो, स्वप्न एका, वादळाचे
त्यास, घेवुन साथ, पायी जायचे...!

वादळाशी, जिंकणे, होते कधी का...?
स्वप्न आहे, वादळा, हरवायचे...!

कवी - महेश घाटपांडे

जेव्हा...

चांदण्याने हात, जाळले जेव्हा
तू मला नेमके, टाळले तेव्हा...

मोगरा नेमका, बेभान झाला
तयाला वेचले, माळले जेव्हा...

सोडले मनाच्या, मी बंधनांना
तू मला बोलली, भाळले जेव्हा...

वाचले डोळ्यात, कोवळे धागे
तू मला एकदा, चाळले जेव्हा...

परतुन आला, श्रावण माझा
कायदे भेटीचे, पाळले जेव्हा...

कवी - महेश घाटपांडे

जगावयाला...

आम्हालाही, शिकवा थोडे, जगावयाला
भुलभुलैया वाली दुनिया, बघावयाला...

घुसमटलो, मी कामामध्ये, वर्षे-वर्षे
मोकळीक द्या, श्वासांनाही, तगावयाला...

पटावरती, बसलो आणि, खिसे मोकळे
दोन आसवें, उरली हाती, लगावयाला...

सरणाशी मी, जग सारे ही, मुठीत होते
मिळायचे ते, नाही लाभले, योग्य वयाला...

कवी - महेश घाटपांडे

माळून गेलो...

दुसरे काही, जरी येथले, टाळून गेलो
तुझा मोगरा, मनात माझ्या, माळून गेलो...

हातावरले, दुःख पाहुनी, कोणी रडले
तळहाताला, मीच स्वतःच्या, जाळून गेलो...

श्रावण होता, नयनी माझ्या, कधी काळचा
तुझाच खांदा, बघुनी थोडा, गाळून गेलो...

तसा कोरडा, शुष्क म्हणोनी, जगलो होतो
कसे कळेना, तुझ्या अंतरी, भाळून गेलो...

दिल्या घेतल्या, दोघांनी बघ, काही शपथा
मीच एकटा, का बरे त्या, पाळून गेलो...?

मुष्कील आहे, तुला वाचणे, जाणून होतो
संदर्भांची, चारच पाने, चाळून गेलो...

गझलकार - महेश घाटपांडे

Saturday, May 2, 2009

निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.



आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?

एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?

तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!

झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’

काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.



तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड

तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड

मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला

तिचं नसणं कण कण जाळत असतं मला

तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.



अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन

मी सुध्दा हलो म्हणेन विसरून माझं मौन

तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले

’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’

दोघांमधलं अंतर आता वार्यासारखं सरत असेल

आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर
वाळुवर बनवलेली
दोन घरं मी स्वत :ची
एक ते लाटेत कोलमडलं
आणि दुसरं ते वाहुन गेलं
काय दोष द्यावा त्या लाटेला ?
वाळुवर घर बनवणं
ही गोष्ट्च मुळ चुकीची
कहाणी ही एका वेडया मनाची............ ........


श्रावणात बहर आला
अख्या रानाला पण
एक कळीही ना
उमलली माझ्या अंगणाला
माझ्या अंगणात होते
हिच चुक का त्या रोपांची
कहाणी ही एका वेडया मनाची ............ ........


चमकत्या त्या वस्तुला
मी नेहमीच सोनं मानलं
समजाऊनही न बदलली
नितीमत्ता माझी
हाव होती तेव्हा मला
त्या चमकत्या सोन्याची
कहाणी ही एका वेडया मनाची............ ........


आता सगळं संपलय ,
उठलाय सगळा बाजार
जडलाय मनाला
एकटेपणाचा भयंकर आजार
डोळ्यात माझ्या डोलतेय
मजेत आता माळ आसवांची
कहाणी ही एका वेडया मनाची............ ........


पाहतोय मी वाट एक
नवी सकाळ उजाडण्याची
पण आता घाई नाही करणार
नवा बाजार मांड्ण्याची
आणि आता वाट पाहणार
नाही कुणाच्या वाटही साथीची
कहाणी ही एका वेडया मनाची ............
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं....!
तुझ्या एका नकाराने
गारा वितळतात म्हणुन त्या
वेचायाचे कोणी सोडित नाही
तुझ्या एका नकाराने
नाते काही मी तोडित नाही
काही ही म्हण तू
पण शब्दानी प्रेम आसे तुटत नाही
नाही भेटलो पुन्हा तरी
न भेटल्याने ह्रुदयातील प्रेम आटत नाही
कळतय मला तुला आज
मझ्यापद्दल काही वाटत नाही
पण लक्ष्यात ठेव
दाबल्याने प्रेम कधी दबत नाही
तू फक्त हसत रहा
दुसर काही ही मी मागत नाही
मेरे नाम के साथ उसका न नाम लीया जाए...
क्यू उस सादादिल को यु बदनाम किया जाए......

खरोच उसके जिस्म पर.....दर्द मेरे सिने में..
सोचता हु ऐसे निस्बत को क्या नाम दिया जाए...

न उसका तसव्वुर है..न याद..न आखो में नमी..
चलो आज की शाम जरा आराम किया जाए....

वो अगर रूबरू हो...और निगाहों में हो निगाह....
फीर क्यू..... मुद्दत्तो तक कोई जाम पिया जाए....

फीर वही शेरो-ओ-सुखन ..फीर उसी का जिक्र ''बादल''
अरे छोडो भी मिया ..अब कुछ काम किया जाए..!!

चुपके-चुपके रात-दिन'चा असाही एक भावानुवाद

मूक अश्रू, ढाळणे, दिनरात ते- स्मरते मला
प्रेमवेड्या भावनांचे, पर्व ते- स्मरते मला
खेचता, अवचित मी पडदा तुझे ते लाजुनी,
ओढणीने चेहऱ्याला झाकणे-स्मरते मला.
तुजसी मी बोलाविता, मज भेटण्या, येणे तुझे,
भर दुपारी, तेही अनवाणीच गे-स्मरते मला
विषय विरहाचा, कधी निघताच, रात्री भेटीच्या,
ते तुझे रडुनी, मलाही रडविणे-स्मरते मला.
लपुनी तु भेटायची, मजला सखे गे, ज्या स्थळी,
उलटली वर्षे परंतु, स्थान ते-स्मरता मला.

Thursday, April 30, 2009

वरात

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली;
अजूनही तशीच तू तनामनात राहिली.


अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा;
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली.


शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे;
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली.


कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे;
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली.


पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला;
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली.

तू दिलेली सोडचिट्ठी...

राख नाही, ना कुठेही धूर थोडासा
काळजाचा पेटला कापूर थोडासा..



भूतकाळाची उजळणी चालली आहे,
दाटला आहे सुखाने ऊर थोडासा!



वाहतो आहेस तू रक्तातूनी माझ्या,
का तरीही वाटशी तू दूर थोडासा?



तू दिलेली सोडचिठ्ठी हरवली आता-
राहिला लक्षात पण मजकूर थोडासा..



थेट लोटांगण अताशा घेत नाही मी,
खरवडूनी पाहतो शेंदूर थोडासा..



सांत्वनाची फार घाई चांगली नाही,
ओसरूदे भावनेचा पूर थोडासा...

फुलांचा रस्ता....

पायाशी आला होता धावून फुलांचा रस्ता
वेडात तुझ्या मी आलो टाळून फुलांचा रस्ता

बरसून तुझ्या अंगावर पाऊस सुगंधी झाला
अन गंध स्वताचा गेला विसरून फुलांचा रस्ता

या जन्मी ओळख नाही होणार तुझी काट्यांशी
तू भाळावरती आली गोंदून फुलांचा रस्ता

ते वेड तुझ्या प्रीतीचे ती ओढ तुझ्या भेटीची
आगीतुन चालत होतो समजून फुलांचा रस्ता

(चालाया तुझिया सोबत प्रेमाला वेळच नाही
तू काय मिळवले आहे मिळवून फुलांचा रस्ता)

हाताला देवुन हिसका ते दिवस पळाले मागे
अन पायाखालुन गेला निसटून फुलांचा रस्ता

तू गेल्यावर

मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते!
तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते!

मी अंगावरच्या जखमा कुरवाळित बसलो होतो
तेव्हाच जख़्म हृदयाचे अपरोक्ष चिघळले होते!

तू गेल्यावरती दिधला मी दोष तुझ्या असण्याला
पण्........अस्तित्व तुझे माझ्यात तेव्हा विरघळले होते!

...चुकले असावे

वागणे चुकले असावे
बोलणे चुकले असावे



पोचलो येथे कसा मी?
चालणे चुकले असावे



आज कां होकार आला?
मागणे चुकले असावे

"अंतरे मिटलीच सारी"
मानणे चुकले असावे



ती सदिच्छा भेट होती!
गुंतणे चुकले असावे



गाव माझाही उजळला?
चांदणे चुकले असावे!



तो म्हणे सर्वत्र आहे
शोधणे चुकले असावे

पाहतो श्वासात कोठे . .लागतो काही सुगावा

पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

ती म्हणाली "माग ना रे. . . तू, मला सोडून काही"
(आरसा बघशील तेव्हा चेहरा माझा दिसावा !)

काय अंधारून आले माझीया प्राणांसभोती
भास् आहे की तुझ्या घनदाट छायेचा विसावा ?

लागलॊ जेव्हा जळाया यातना झाल्या न काही
पोसले आजन्म ज्याला , देह हा माझा नसावा

Wednesday, April 8, 2009

"....तयार झालो"

जसा जसा मी जगावयाला तयार झालो,
तसा तसा मी लढावयाला तयार झालो..

सडा असा शिंपलास तू अंगणात माझ्या,
पसा पसा मी भरावयाला तयार झालो..

बघून मागे कशीबशी हासलीस जेव्हा,
कसाबसा मी हसावयाला तयार झालो..

न खंत आभाळ फाटण्याची मला तशी पण,
ससा कसा मी बनावयाला तयार झालो?

विषा, तुला ओळखून होतो तरी कसा रे,
नसा नसा मी भरावयाला तयार झालो?

अखेर तू ही मनातले बोललीस जेव्हा,
ढसा ढसा मी रडावयाला तयार झालो !

तुझी न ही पायधूळ जेव्हा मला कळाले,
ठसा ठसा मी पुसावयाला तयार झालो..

तिने नव्याने दिला जरी तो जुना बहाणा,
असा कसा मी फसावयाला तयार झालो

रंग माझा वेगळा!

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

चुकलेच माझे

मी कशाला जन्मलो? - चुकलेच माझे!
ह्या जगाशी भांडलो! - चुकलेच माझे!

मान्यही केलेस तू आरोप सारे,
मीच तेव्हा लाजलो! - चुकलेच माझे!

सांग आता, ती तुझी का हाक होती?
मी खुळा भांबावलो! - चुकलेच माझे!

भोवतीचे चेहरे सुतकीच होते,
एकटा मी हासलो - चुकलेच माझे

चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!

पाहिजे पूजेस त्यांना प्रेत माझे!
मी जगाया लागलो! - चुकलेच माझे!

वाट माझ्या चार शब्दांचीच होती..
मी न काही बोललो! - चुकलेच माझे!

गझल माझी तसतशी

पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते

फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते

पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते

केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते

काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते

काय या मद्यात जादू कोण जाणे?
घोट जातो आत छाती रुंद होते

का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते

जसजसा जमिनीमधे मी एक होतो
गझल माझी तसतशी उत्तुंग होते

पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते?

सखे

नको वेळ लावू सखे बोल आता
मनाची कवाडे जरा खोल आता

तुझे चिंब होणे मला आवडे पण
कुणी सावरावा कसा तोल आता

जगाला कळाले किती चांगला मी
तुलाही कळूदे ख्ररे मोल आता

इथे वेदनांचे उमाळे उसासे
कुठे डोळियांना खरी ओल आता

असे भावनांनी गडे घे उ़खाणे
सुखाला मनाच्या पुरे सोल आता