Wednesday, April 8, 2009

गझल माझी तसतशी

पाहुनी उत्साह माझा सुन्न होते
उम्र होण्याचीच माझ्या उम्र होते

फार अंतर भेटण्यामध्ये नसावे
प्रेम राही बाजुला अन झुंज होते

पाडले ज्या ज्या शहाण्यांना इथे मी
खालच्या बाजूस त्यांच्या उंट होते

केवढा पिवळा अताशा वाटशी तू
सापडावे जे जुने हळकुंड होते

काय या देहात जादू कोण जाणे?
मद्य जाते आत आणी धुंद होते

काय या मद्यात जादू कोण जाणे?
घोट जातो आत छाती रुंद होते

का मला ओलावते आहेस आता?
जन्मभर आयुष्य हे निवडुंग होते

जसजसा जमिनीमधे मी एक होतो
गझल माझी तसतशी उत्तुंग होते

पावसाची चिन्हही नाहीत येथे
वाळवंटाची हवा का कुंद होते?

No comments:

Post a Comment