Friday, March 25, 2011

रिवाज पाळू...

रिवाज पाळू , जरी शहारा कुठेच नाही..
तुझ्या न माझ्याकडे.. बिचारा कुठेच नाही !

बरेच काही जुनेपुराणे पडून आहे..
मनात आहे तसा पसारा कुठेच नाही !

दिशा तुला पाखरा कशी सापडेल आता?
नभातला तो प्रकाशतारा कुठेच नाही..

निबंध माझा अशामुळे वाटतो अधूरा,
लहानसा तो तुझा उतारा कुठेच नाही..

पुन्हा असे तू नकोनकोसे नकोच बोलू ,
मला हवे तेच बोलणारा कुठेच नाही

तुझ्याच डोळ्यात राहतो मी, कुठे न जातो
हवाहवासा असा पहारा कुठेच नाही..

पुन्हा जरासे कुशीत आता मला शिरूदे,
जगात सार्‍या असा निवारा कुठेच नाही..

तुला पटो ना पटो, तरी हे असेच आहे
तसा किनारा..पहाटवारा... कुठेच नाही !

बघून माझी तहान वेडी, सुखावली ती..
सुरा म्हणाली- "असा पिणारा कुठेच नाही..!"

फुला, तुला स्पर्शल्यावरी एवढे कळाले -
"कुठेच नाही ! असा निखारा कुठेच नाही.."

पुनर्भेट

चालला तुझा नवा बनाव आजही
राहिला तसाच का स्वभाव आजही?

फैर झाडतेस तू सरावल्यापरी
तोकडाच आमचा बचाव आजही..

मी मनातल्या मनात बोललो मला-
"केवढा तरी हिचा प्रभाव आजही !"

खेटुनी बसायला नकोच एवढे,
पाहतो दुरून हा जमाव आजही

दोन चुंबके जणू समोर ठेवली
आपल्यामधे असा तणाव आजही

या घरात एकटे न वाटले कधी,
नांदतो इथे तुझा अभाव आजही !

शेवटी हरून चोरलीस ना नजर?
लागला कुठे तुझा निभाव आजही..

एवढी गुणी बनू नकोस ना सखे,
छेड आजही, मला सताव आजही..

फायदा किती करून देतसे मला,
एकटे रडायचा सराव आजही...

काय आपल्यात जे टिकून राहिले?
काय आपल्यात बेबनाव आजही?

भेट ही अशी विरून जायला नको..
मर्म कोणतेतरी दुखाव आजही

Wednesday, March 2, 2011

आवेग दाटलेला

वाहून काल गेला , राहून साचलेला !
वाही मढे मनाचे , हा जीव वाचलेला !!
रंगात रंगण्या त्या राधा बनून आले ,
का रे प्रतारणेचा तू रंग फ़ासलेला ?

मागून प्रेम येथे भेटे कधी कुणा का ?
गाठून तू विषाचा प्यालाच पाजलेला !

त्यागून मोह-माया मी चालले तरीही ,
का व्यर्थ सूड घेई हा बंध काचलेला !

तोडूनही तुटेना ही पोत मानभावी ,
मेल्याविणा सुटेना हा पीळ जाचलेला !

येईल पावसाळा ही आस मोरपंखी ,
शब्दात मांडवेना आवेग दाटलेला !!

वेदना

जग जरी भलत्या नशेने चूर आहे
वेदना माझी मला मंजूर आहे

राखतो या चेहर्‍याला निर्विकारी
लपविण्या हृदयातले काहूर आहे

सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहताहे आसवांचा पूर आहे

काय लावू चाल मी या जीवनाला
जीवनाचे गीत तर बेसूर आहे

गवगवा ''कैलास'' करणे ठीक नाही
मूक आहे 'तो' तरी मशहूर आहे.

-डॉ.कैलास गायकवाड

पाणी थकले, जमीन थकली

पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

कुठे हरवले तुझे नि माझे घन ते आनंदाचे ?
काय तुझ्या माझ्या जगण्याचा मोरपिसारा झाला ?

आधी होते चंद्र, कळ्या, पक्षांचे येणेजाणे
नको विचारू अता कशाचा मनी निवारा झाला

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला

नव्वद वर्षाची ती आजी खरे बोलली होती
पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प म्हतारा झाला...

- वैभव देशमुख