Friday, March 25, 2011

पुनर्भेट

चालला तुझा नवा बनाव आजही
राहिला तसाच का स्वभाव आजही?

फैर झाडतेस तू सरावल्यापरी
तोकडाच आमचा बचाव आजही..

मी मनातल्या मनात बोललो मला-
"केवढा तरी हिचा प्रभाव आजही !"

खेटुनी बसायला नकोच एवढे,
पाहतो दुरून हा जमाव आजही

दोन चुंबके जणू समोर ठेवली
आपल्यामधे असा तणाव आजही

या घरात एकटे न वाटले कधी,
नांदतो इथे तुझा अभाव आजही !

शेवटी हरून चोरलीस ना नजर?
लागला कुठे तुझा निभाव आजही..

एवढी गुणी बनू नकोस ना सखे,
छेड आजही, मला सताव आजही..

फायदा किती करून देतसे मला,
एकटे रडायचा सराव आजही...

काय आपल्यात जे टिकून राहिले?
काय आपल्यात बेबनाव आजही?

भेट ही अशी विरून जायला नको..
मर्म कोणतेतरी दुखाव आजही

No comments:

Post a Comment