Friday, March 25, 2011

रिवाज पाळू...

रिवाज पाळू , जरी शहारा कुठेच नाही..
तुझ्या न माझ्याकडे.. बिचारा कुठेच नाही !

बरेच काही जुनेपुराणे पडून आहे..
मनात आहे तसा पसारा कुठेच नाही !

दिशा तुला पाखरा कशी सापडेल आता?
नभातला तो प्रकाशतारा कुठेच नाही..

निबंध माझा अशामुळे वाटतो अधूरा,
लहानसा तो तुझा उतारा कुठेच नाही..

पुन्हा असे तू नकोनकोसे नकोच बोलू ,
मला हवे तेच बोलणारा कुठेच नाही

तुझ्याच डोळ्यात राहतो मी, कुठे न जातो
हवाहवासा असा पहारा कुठेच नाही..

पुन्हा जरासे कुशीत आता मला शिरूदे,
जगात सार्‍या असा निवारा कुठेच नाही..

तुला पटो ना पटो, तरी हे असेच आहे
तसा किनारा..पहाटवारा... कुठेच नाही !

बघून माझी तहान वेडी, सुखावली ती..
सुरा म्हणाली- "असा पिणारा कुठेच नाही..!"

फुला, तुला स्पर्शल्यावरी एवढे कळाले -
"कुठेच नाही ! असा निखारा कुठेच नाही.."

No comments:

Post a Comment