निशिगंध तिच्या नजरेचा
डोळ्यात दर्वळे माझ्या
चाहूल तिच्या प्रीतीची
हृदयात दरवळे माझ्या
आभास सारखा होतो
ती आली येत असावी
झंकार पैंजणाचा त्या
कानात दर्वळे माझ्या
रेषांचे तळहातावरल्या
ताटवे फुलांचे झाले
तो हात तिच्या मेंदीचा
हातात दर्वळे माझ्या
ओठांनी ओठावरती
मग लिहिली सुंदर गाणी
तो स्पर्श तिच्या श्वासांचा
रक्तात दर्वळे माझ्या
लाजून बिलगली मजला
हलकेच म्हणाली सजना
अनमोल प्रीतीचा अपुल्या
स्वप्नात दर्वळे माझ्या.
No comments:
Post a Comment