जुळा ध्यास आहे तुलाही, मलाही
तरी त्रास आहे तुलाही, मलाही..
कसे ओळखावे तुला मी, मला तू..
व्यथा खास आहे, तुलाही, मलाही
अताशा मिठीही अशी वाटते की,
गळा फास आहे तुलाही, मलाही..
जुन्या लालसेचा विझेना निखारा,
नवी आस आहे तुलाही, मलाही..
तशी एक आहे व्यथा सारखीशी,
म्हणायास आहे, तुला- ही, मला- ही
कशाला कुणी दोष द्यावा कुणाला
'इतीहास' आहे, तुलाही..मलाही...!!
No comments:
Post a Comment