Saturday, April 23, 2011

जुने, विसरून गेलेले...

कधी रडवून गेलेले, कधी हसवून गेलेले
पुन्हा का आठवावे ते, जुने विसरून गेलेले...

पुन्हा सारे तपासावे मला लागेल एकांती,
कधी जे वाटले होते मला समजून गेलेले

कसे चुकले जरा माझे, मला शिकवू नका कोणी,
पहा , चुकलेत ते सारे - मला शिकवून गेलेले

पुन्हा ती भेटली तेव्हा, जराशी वेगळी होती
इरादे वाटले आता, तिचे बदलून गेलेले..

दिलासा, सांत्वने, अश्रू, जिव्हाळा, प्रेम नी माया..
किती हे शब्द लेकाचे, मला फसवून गेलेले !

कुणी बिलगूनही नाही, मनाला वाटले प्यारे
कुणी लांबूनही होते, ठसा उठवून गेलेले...

कुणाचे श्वासही छातीत माझ्या मोजता यावे,
कुणी नाही , कुणी नाही , असे जवळून गेलेले

असावी वाट एखादी, दिशा छेदून जाणारी
दिसावे गाव एखादे, व्यथा हरवून गेलेले !

मला भेटायला आले, मला भेटून जातांना-
मला भेटायचे नाही , असे ठरवून गेलेले...

जरासे थांबले नाही, कुणी माझ्या चितेपाशी
जरा हेलावले नाही, मला उचलून गेलेले....

No comments:

Post a Comment