Sunday, April 17, 2011

बदनाम

मी नाव का कुणाचे घेऊ उगा कशाला?
हा दोष संचिताचा वैरी सखा निघाला...

का एवढ्याचसाठी ही साथ सोडली तू?
की ऐनवेळ ओठी माझ्या नकार आला...

हे ही बरेच झाले की बोललास खोटे
आहे कुठे खर्‍याची परवा इथे कुणाला?...

कळले असेल आता रडले पुन्हा पुन्हा का?
जखमा नवीन होत्या नाजूक काळजाला...

ढळता उन्हे तशी ती जाते विरून छाया
हा शाप सावलीला देवा दिला कशाला?...

मीरा तुझ्याचपायी प्याली जरी विषाला
बदनाम शाम तू रे नाही कधीच झाला...

No comments:

Post a Comment