Thursday, December 30, 2010

पुढे सरू की जाऊ मागे...

पुढे सरू की जाऊ मागे काय करू...?
द्वीधा द्वीधा या हृदयाचे काय करू ?

इथेच झोपू की एखादे घर शोधू ?
वहीत आहे काही पत्ते काय करू ?

पुढच्या थांब्यावरती उतरुन जाशिल तू
तुझ्यासवे मी बोलुन खोटे काय करू ?

रद्दी सारी विकून आलो बाजारी
आता हे कवितांचे गठ्ठे काय करू ?

तुझी आठवण बिलगुन या ब्रम्हांडाला
तुझ्यासारखे दिसते सारे काय करू ?

सत्य दाटले पेनाच्या टोकावरती...
पुढ्यात आहे कागद कोरे काय करू ?

तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खावू हे दाणे ? काय करू ?

माझ्या तुझ्यात काही

माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला काही असे असावे

पंचांग म्हणत होते की आजची अमावस
येता समोर तू कां मग चांदणे पडावे?

आडून चौकशी कां होते तुझ्याकडूनी?
प्रस्ताव थेट काही आता पुढ्यात यावे

अफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी
बघुनी मला तुझे ते क्षण थांबणे असावे

माझ्याच काळजाची ही काय राजनीती?
सोडून पक्ष माझा जाऊन तुज मिळावे

फडफडतो काळजात माझ्या...

फडफडतो काळजात माझ्या या प्रश्नाचा कागद
स्वच्छ कुण्या रबराने होइल आयुष्याचा कागद

अदभुत गोष्टींनी भरलेले आजोबांचे पुस्तक
ताऱ्यांची कविता लिहिलेला अंधाराचा कागद

किती किती होकार घेउनी वेळा आल्या, गेल्या
हाय ! अपूरा पडला माझ्या तळहाताचा कागद

अक्षर अक्षर तिचे तेवते दिवा बनुन वाटेवर
तिच्या जवळ नव्हता कुठलाही ती शिकल्याचा कागद

शहर नवे होते कोणाची ओळख पाळख नव्हती
'नाही' 'नाही'ने भरला माझ्या दिवसाचा कागद

तुला पुरेना सागरशाई माझ्या निंदेसाठी
तुझ्या स्तुतीला मला पुरेना आकाशाचा कागद

अखेर पुसता आली नाही ती चुकलेली नावे
लेखण होती दगडाची, होता दगडाचा कागद

- वैभव देशमुख