Wednesday, March 2, 2011

पाणी थकले, जमीन थकली

पाणी थकले, जमीन थकली बिमार वारा झाला
समजून घेता आला तर घे खास इशारा झाला

कुठे हरवले तुझे नि माझे घन ते आनंदाचे ?
काय तुझ्या माझ्या जगण्याचा मोरपिसारा झाला ?

आधी होते चंद्र, कळ्या, पक्षांचे येणेजाणे
नको विचारू अता कशाचा मनी निवारा झाला

डिग्री, पदके, प्रमाणपत्रे, शाली, स्म्रुतीचिन्हे...
घर छोटेसे झाले आणिक खूप पसारा झाला

नव्वद वर्षाची ती आजी खरे बोलली होती
पृथ्वीला तोलुन धरणारा सर्प म्हतारा झाला...

- वैभव देशमुख

No comments:

Post a Comment