Sunday, May 10, 2009

माळून गेलो...

दुसरे काही, जरी येथले, टाळून गेलो
तुझा मोगरा, मनात माझ्या, माळून गेलो...

हातावरले, दुःख पाहुनी, कोणी रडले
तळहाताला, मीच स्वतःच्या, जाळून गेलो...

श्रावण होता, नयनी माझ्या, कधी काळचा
तुझाच खांदा, बघुनी थोडा, गाळून गेलो...

तसा कोरडा, शुष्क म्हणोनी, जगलो होतो
कसे कळेना, तुझ्या अंतरी, भाळून गेलो...

दिल्या घेतल्या, दोघांनी बघ, काही शपथा
मीच एकटा, का बरे त्या, पाळून गेलो...?

मुष्कील आहे, तुला वाचणे, जाणून होतो
संदर्भांची, चारच पाने, चाळून गेलो...

गझलकार - महेश घाटपांडे

No comments:

Post a Comment