मी प्रेम दे म्हणालो, 'देते' म्हणून गेली
जे जे मनात माझ्या, ते ते म्हणून गेली...
मी हे हृदय सखीच्या जेंव्हा पुढ्यात केले
ना बोलता खुणेने 'घेते' म्हणून गेली...
सुख-दु:ख वाटताना देऊन सौख्य मजला
सार्या व्यथा मला मी नेते म्हणून गेली...
त्यांना नसेल कळली प्रीती तिची नि माझी
ती चक्क माणसांना 'प्रेते' म्हणून गेली...
देऊन प्राण ज्यांनी प्रितीस अमर केले
त्या सर्व प्रेमिकांना 'जेते' म्हणून गेली...
ओळख मलाच माझी होती नवीन तेंव्हा
जेंव्हा तिच्या सख्यांना हे, 'ते' म्हणून गेली..
हा काय दोष माझा? ते वय उनाड होते
स्पर्शात अंग माझे चेते म्हणून गेली..?
मी रोज वाट बघतो जाऊन त्या ठिकाणी
जेथे कधी मला ती 'येते' म्हणून गेली...
No comments:
Post a Comment