जन्मभर तुडवीन मी रस्ता उन्हाचा
पण तुला स्पर्शू नये ठिपका उन्हाचा
पूर आला हे बरे डोळ्यात झाले
साचला होता किती कचरा उन्हाचा
मी जशी खिडकी उघडली, आत आला
केवढ्या वेगामधे तुकडा उन्हाचा
दग्ध ओठांनी तुझ्या केसांमधे मी
माळला होता कसा गजरा उन्हाचा
यामुळे तर ऊन्ह हे जळते तुझ्यावर
रंग नाही एवढा गोरा उन्हाचा
घालतो पायामधे चपला उन्हाच्या
हिंडतो बांधून तो पटका उन्हाचा
राहते माझ्यासवे छायेप्रमाणे
जीव माझ्यावर कसा इतका उन्हाचा
दिवस गेला, सांज ढळली पण अजुनही
उडत आहे मंदसा धुरळा उन्हाचा
No comments:
Post a Comment