Wednesday, September 29, 2010

..चर्चा

नाही अजून झाली, माझ्या-तुझ्यात चर्चा..
माझ्या-तुझ्यातल्याची .. सार्‍या जगात चर्चा



आता कुठे जरासे संकेत मोडले तू
आता कुठे जराशी आली भरात चर्चा..



येणार ती पुन्हा रे.. ठोका चुकेल ना रे..?
छातीत स्पंदनांची आपापसात चर्चा !



भेटूनही न वाटे मित्रास भेटल्याचे
पेल्यात व्हायच्या त्या, झाल्या कपात चर्चा



"आधी असा न होता.. हातामधून गेला.."
हल्ली अशीच चाले माझ्या घरात चर्चा



चर्चेमधून सार्‍या निष्कर्ष काढला मी-
करणार ना कधी मी, या जीवनात चर्चा !



खच्चून दे शिवी तू, भांडून घे जरासे
घोळायच्या कशाला आता तुपात चर्चा ?*



उल्लेख झुंजण्याचा झाला न कोणताही,
माझ्या पराभवाची दाही दिशात चर्चा..



चुकले कसे कुणाचे?.. बोलू निवांत वेळी
हातात हात दे तू, का वादळात चर्चा ?



संवाद मूक झाले... स्पर्शात शब्द आले..
गेल्या फिटून शंका.. गेल्या ढगात चर्चा !!

No comments:

Post a Comment